मराठी भाषेतील म्हणी
Marathi mhani aani arth-मराठी भाषेतील ७५ म्हणी आणि त्यांचे अर्थ
प्रत्येक भाषेत काही म्हणी Marathi mhani aani arth असतात. म्हण म्हणजे आशय वेगळा असणारे अलंकारिक वाक्य. म्हणी,वाक्प्रचार,सर्वनामे हे त्या भाषेचे अलंकार असतात. त्यामुळे भाषा समृद्ध होते. म्हणीचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो. तर त्या शब्दातील आशय,भाव,भावना समजून घ्यायची असते.जसे की “लेकी बोले सुने लागे” या म्हणी मध्ये सुनेला बोलायचे आहे परंतु सुनेला न बोलता लेकीला बोलून सुनेला टोमणा मारणे हा त्याचा अर्थ आहे.अशा म्हणी मुळे भाषा आणखी गोड होत असते.भाषेतील रटाळपणा कमी होतो.या भागात मराठी भाषेतील अनेक म्हणी आणि त्यांच्या अर्थाचे स्पष्टीकरण दिले आहे.विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल.
सर्व परिचित म्हणी आणि अर्थ
- अति तेथे माती-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा शेवट किंवा त्याचा परिणाम हा वाईट होत असतो.
- क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे-काही लोक काम न करता नुसती वायफळ बडबड करत असतात ते अगदी व्यर्थ असते.
- करावे तसे भरावे-जसे कार्य आपल्या हातून होईल तसा त्यांचा परिमाण असेलचागले काम केले तर चांगला परिणाम आणि वाईट कामाचा वाईट
- ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे-ज्याचा आपण सतत विचार करत असतो त्याचीच आपल्याला स्वप्ने पडत असतात.
- न कर्त्याचा वार शनिवार-ज्याला काम करायचे नाही ती व्यक्ती काम टाळण्यासाठी अनेक कारणे, सबब सांगत असते.
- प्रयत्ना अंती परमेश्वर-प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि त्यातून लाभ मिळत नाही.
- फाटक्या परिस नेटके बरे-आपले कपडे साधे असले तरी चालतील परंतु नेटके आणि स्वच्छ असावेत.
- फार खाणे नी मसणात जाणे-प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने व्याधी होतात त्यामुळे पचेल तेवढेच खावे.
- ये रे माझ्या मागल्या-एखाद्या मूर्ख माणसाला कितीही उपदेश केला तरीही तो पूर्वीप्रमाणे वागतो. त्यात सुधारणा होत नाही.
- रात्र थोडी सोंगे फार-काम भरपूर असणे परंतु पूर्ण करण्यासाठी वेळ कमी पडणे.
- विनाश काले विपरीत बुद्धि-माणसाच्या अडचणीच्या किंवा संकटाच्या काळात आपले डोके काम करत नाही.आपल्या हातून विपरीत घडून जाते.
- फार बोलेना वाट भुलेना-काही लोक बडबड न करता आपले काम पूर्ण करत असतात,जास्त न बोलता आपल्या मताप्रमाणे वागत असतात.
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ-एखाद्या अप्रामाणिक व्यक्ती सोबत मैत्री केली असेल तर त्याचे परिणाम वाईट होतात.त्याची सोबत आपल्या प्राणावर बेतू शकते.
- अंधारात केले पण उजेडात आले-एखादे चुकीचे काम चोरून-लपून केले असेल तर ते कधी ना कधी सर्वांसमोर येते.
- अतिपरिचयात अवज्ञा-जास्त परिचय झाला असेल तर तेथे एकमेकांचा सन्मान ठेवला जात नाही.
व्यक्तीवर आधारित म्हणी आणि अर्थ Marathi mhani aani arth
- ओळखीचा चोर जीव न सोडी-आपल्या ओळखीचा किंवा जवळचा शत्रू हा अनोळखी शत्रू पेक्षा अधिक भयंकर असतो.
- हिंमत मर्दा तो मदत खुदा-धाडसी माणूस आपले काम पूर्ण करतो किंवा धाडसी माणसाला कुणाच्याही मदतीची गरज नसते.
- लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरे-लबाड माणसाने दिलेले वचन किंवा हमी काम पूर्ण झाल्यावर वा वचनपूर्ती झाल्यावरच खरी समजावी.
- येईना अन जाईना माझे नाव मैना-काही लोकांना अंगी कोणतेही चांगले गुण नसतात परंतु मोठेपणा मिरवण्यासाठी खूपच हौस असते.
- दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ-कधीकधी दोघे जण वाद करत राहतात,भांडण करत असतात आणि त्या वादात तीसर्याच व्यक्तीचा फायदा होत असतो.
- कोठे राजा भोज ? नी कोठे गंगू तेली ?-थोर माणूस आणि कमविचारी माणूस यांची तुलना होऊ शकत नाही.
- गरजवंताला अक्कल नसते-ज्याला गरज असते ती व्यक्ती मूर्ख मानसाचे सुद्धा बोलणे सहन करते.
- गुरुची विद्या गुरूलाच-कधी कधी एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे.
वस्तूंवर आधारित म्हणी
- अपापाचा माल गपापा-चोरीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती चुकीच्या कामासाठीच खर्च होते आणि नष्ट होते.
- बडा घर पोकळ वासा-काही लोक फार श्रीमंती दाखवत असतात परंतु प्रत्यक्षात मात्र तसे काहीही नसते. त्यांचे वर्तन श्रीमंतीच्या लाईकीचे नसते.
- घर ना देवळी बिऱ्हाड-ज्याच्या मागे पुढे कुणीही नाही किंवा ज्याच्यावर कोणतीही जबाबदारी नाही असा माणूस.
- घरी शिमगा आणि बाहेर दिवाळी-काही लोक बाहेर खूप खर्चिक असतात मात्र घरची परिस्थिती गरिबीची असते.गरीब असून उधळपट्टी करणारे.
- घरोघरी मातीच्या चुली-सगळी कडे परिस्थिती ही सारखीच असते.जसे की “पळसाला पाने तीनच”
- एकाच माळेचे मणी-सर्व लोकांचा स्वभाव सारखा असतो किंवा सर्वांचे वागणे सारखेच असणे.
- औषधावाचून खोकला गेला-एखादी समस्या किंवा संकट काहीही उपाययोजना न करता टळणे.
- कोळशाच्या व्यापारात हात काळे-कोणतेही वाईट काम करत असाल तर शेवटी त्याचे फळ वाईटच मिळेल.
- कोळसा उगाळावा तितका काळाच-कोणत्याही वाईट गोष्टीबद्दल कितीही चर्चा केली तरी त्यातून काहीही चांगले निष्पन्न होत नाही.
- देश तसा वेष-जशी परिस्थिती बदलते तसे लोकांचे वर्तन बदलत असते.
- धीर धरील तो खीर खाईल-जो शांतपने आपले काम पूर्ण करत असतो त्याला योग्य फळ मिळते.
- आगीतून फुपाट्यात-एका समस्येतून गेल्याबरोबर लगेच दुसऱ्या समस्या निर्माण होणे किंवा एक संकट जात नाही तोच दुसरे संकट उभे राहणे.
- वडाची साल पिंपळाला-ज्या दोन वेगवेगळ्या गोष्टीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही अशाचा संबंध एकत्र जुळवण्याचा प्रयत्न करणे.
- वारा पाहून पाठ द्यावी-जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने आपण वागले पाहिजे.
- दृष्टी आड सृष्टी-आपल्या डोळ्या पाठीमागे जे काही चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
प्राण्यांवर आधारित म्हणी
- अडला हरी गाढवाचे पाय धरी-एखादा बुद्धिमान व्यक्ती अडचणीत सापडला असेल तर त्याला मूर्ख माणसाचे मदत घ्यावी लागते.
- हत्ती गेला शेपूट राहिले-कामाचा जवळ्पास सगळाच भाग पूर्ण झाला परंतु थोड्याशा भागासाठी अडचणी येणे.
- हत्ती चालतो कुत्री भुंकतात-काही महान लोक आपले चांगले कार्य करत असतात परंतु काही वाईट प्रवृत्तीचे लोक सतत निंदानालस्ती करत असतात.
- वरातीमागून घोडे-गरज संपल्यानंतर उपाय शोधणे किंवा उपाय प्राप्त होणे.योग्य वेळी योग्य गोष्ट न प्राप्त होता ती विना कामाच्या वेळी उपलब्ध होते.
- लकडीके बलपे मकडी नाचे-काही लोक धाक दाखवल्याशिवाय योग्य काम करत नाही.
- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर-काही लोक फक्त गरजेपुरत्या गोष्टी सोबत घेऊन फिरतात.
- मेल्या म्हशीला मणभर दूध-प्रत्यक्षात जिवंत असताना मनात वाईट भावना ठेवणे आणि माणूस मेल्यावर त्याचे गुणगान करणे.
- जलात राहून माशाशी वैर करू नये-ज्यांच्यावर आपण अवलंबून आहोत त्याच्याशी बदमाश पणा करू नये.
- कोल्हा काकडीला राजी-कमविचारी माणसे थोड्याशा आमिषाने लगेच तयार होतात किंवा लगेच राजी होतात.
- म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात-आपली माणसे किंवा आपली मुलेबाळे आपल्याला कधीच जड वाटत नाही किंवा त्यांची अडचण होत नाही.
- गाड्याबरोबर नळ्याची जत्रा-कधी कधी मोठ्या माणसाबरोबर छोत्याचांही फायदा होतो किंवा कधीकधी इतर लोकांसोबत काहीही न करता दुसऱ्याचा फायदा होतो.
अवयवावर आधारित म्हणी
- हाताच्या काकणाला आरसा कशाला ?-एखादी गोष्ट स्पष्ट असेल तर त्यासाठी पुरावा देण्याची गरज नसते.
- हात दाखवून अवलक्षण-स्वतः हुन एखादी पीडा मागे लावून घेणे किंवा स्वतः हून दुसऱ्याला मदत करताना स्वतःला अडचणीत येणे.
- लहान तोंडी मोठा घास-आपल्या योग्यतेपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा मोठे काम हाती घेणे.
- रिकामे मन सैतानाचे धन-करण्यासाठी कोणतेही काम नसेल म्हणजेच डोके रिकामे असेल तर मनात वाईट विचार येत असतात.
- खाई त्याला खवखवे-जो व्यक्ती वाईट काम करत असतो त्याच्या मनात नेहमी धास्ती असते.
- अंगापेक्षा बोंगा मोठा-वस्तुस्थिती पेक्षा त्याचे वर्णनच फार मोठे करणे.प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूपच कमी असते.
- ओठात एक पोटात एक-बोलणे व प्रत्यक्ष कृती यात अंतर असणे. बोलतांना दुसरेच बोलायचे आणि प्रत्यक्षात मनात मात्र दुसरेच विचार असणे.
- आधी पोटोबा मग विठोबा-आधी आपल्या पोटापाण्याची सोय पाहने नंतर देव-धर्म करणे. म्हणजेच आधी स्वार्थ मग परमार्थ.
- एका हाताने टाळी वाजत नाही-दोघांच्या भांडणात कधीही एकाचा दोष नसतो.त्यात दोघेही दोषी असतात.
हे वाचा- मराठी भाषेतील ७५ वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि त्यांचे वाक्यात उपयोग.